कोल्हापूर : राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेचे अधिकारी असल्याचे सांगत ऑनलाईन अटक करून उद्योजकाची ८१ लाखांची लुट केल्याची घटना उघडकीस आली आहे. उदय दुधाणे असं फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नावं असून ते माजी नगरसेवक आहेत. दुधाणे यांना दहशतवादी समुहाला आर्थिक मदत केल्याची भीती घालत अज्ञातांनी ही फसवणूक केली. हा प्रकार ६ ते ११ सप्टेंबर दरम्यान घडला. याबाबत उद्योजकाने शुक्रवारी (दि. १३) राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फसवणूक झालेले उद्योजक गोशिमाचे माजी अध्यक्ष आहेत.
राजारामपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुधाणे यांना सहा सप्टेंबरला एक व्हॉट्सॲप कॉल आला. आपण ‘एनआयए’चे अधिकारी असल्याचे त्यांना पलीकडून सांगण्यात आले. तसेच ‘हैदराबाद येथील एका व्यक्तीने दहशतवादी समुहाला १२२ कोटी रुपयांची मदत केली आहे. या पैशांमधून दहशतवाद्यांनी शस्त्रे खरेदी केली आहेत. या व्यवहारात तुमच्या बँक खात्यात २० ते २२ कोटी रुपये वर्ग झाले आहेत. ‘न्यायालयाच्या आदेशानुसार तुम्हाला एका गंभीर गुन्ह्यात ऑनलाइन अटक केली आहे,’ असे त्यांनी दुधाणे यांना सांगितले. यानंतर दुधाणे भयभीत झाले आणि त्यांनी शिवाजी पार्कातील हॉटेलमध्ये तीन दिवस आसरा घेतला
यावेळी या भामट्यांनी दुधाणे यांची सुटका करण्यासाठी पैशांची मागणी केली. दुधाणेंनेही तातडीने संशयिताने दिलेल्या बँक खात्यावर ८१ लाख जमा केले. अशा प्रकारे आरोपीने त्यांना तब्बल ८१ लाख रुपयांचा गंडा घातला. त्यासाठी त्यांना तब्बल तीन दिवस एका हॉटेलमध्ये ठेवले होते. कोल्हापूरातील डिजिटल माध्यमांतील फसवणुकीचा हे तिसरे प्रकरण आहे. यामुळे पोलिसांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.