: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीच्या अवस्थेवर सादर झालेल्या अहवालाची पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने तातडीने दखल घेतली असून मूर्तीवर भारतीय पुरातत्त्व खात्याच्या वतीने उद्या रविवारी व सोमवारी संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार आहे. भाविकांसाठी पितळी उंबऱ्याच्या बाहेरून कलश व उत्सवमूर्तीच्या दर्शनाची सोय केली असून भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थान समितीचे प्रशासन तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीची प्रचंड झीज झाली असून ४ तारखेला झालेल्या सुनावणीत तज्ज्ञांनी पाठवलेल्या अहवालावर चर्चा झाली. यात तज्ज्ञांनी तातडीने मूर्तीचे संवर्धन करून घ्यावे, अशी शिफारस केली होती. त्याची पुढील सुनावणी २३ तारखेला होणार आहे. तसेच मूर्ती सुस्थितीत राहण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी मूर्तीची पाहणी करण्यासाठी वेळोवेळी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाला कळविले होते. त्यानुसार विभागाच्या तज्ज्ञांनी मूर्तीची पाहणी केली.
मूर्ती सुस्थितीत राहण्यासाठी मूर्तीची संवर्धन प्रक्रिया करण्याबाबतचा अहवाल विभागाने दिला आहे. त्या अहवालाच्या अनुषंगाने, देवस्थान समितीने २८ मार्च रोजी महासंचालक भारतीय पुरातत्त्व विभाग नवी दिल्ली यांना मूर्तीचे संवर्धन प्रक्रिया करण्याबाबत कळविले आहे. त्यानुसार भारतीय पुरातत्त्व विभागाच्या वतीने अंबाबाईच्या मूर्तीचे संवर्धन उद्या रविवारी व सोमवारी करण्यात येणार आहे.