कोल्हापूर : जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यानंतर मतदारसंघातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. तर ए. वाय. पाटील तुतारी हातात घेणार असल्याच्या चर्चा सुरु असल्याने बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तसेच कॉंग्रेस पक्षानेही राधानगरीच्या जागेवर दावा सांगितला आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी माजी आमदार के. पी. पाटील यांच्या शिष्टमंडळाने आमदार सतेज पाटील यांची काँग्रेस कमिटीत भेट घेत विधानसभा उमेदवारीबाबत चर्चा केली.
राधानगरीच्या जागेबाबत के. पी.’ यांच्या शिष्टमंडळाने सतेज पाटील यांच्या शिष्टमंडळाने सतेज न्पातील यांची भेट घेऊन विधानसभा उमेदवारीबाबत त्यांनी चर्चा केली. पण, ही जागा महाविकास आघाडीमध्ये नेमकी कोणाला जाईल, त्याचा गुंता जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत अडचणी असल्याचे सांगण्यात आले. तर जागेच तिढा सुटल्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असेही सतेज पाटील म्हणाले.
तर सतेज पाटील यांची भेट घेण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळात जिल्हा बँकेचे संचालक रणजितसिंह पाटील, ‘गोकुळ’चे संचालक प्रा. किसन चौगले, ‘भोगावती’चे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील-कौलवकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मधूआप्पा देसाई, ‘बिद्री’चे संचालक राजेंद्र पाटील, उमेश भोईटे, राजू भाटले, भिकाजी एकल आदी यांचा समावेश होता.
तर जिल्ह्याच्या राजकारणात के. पी. पाटील हे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत आहेत. मात्र, महायुतीमध्ये ही जागा शिंदे गटाला जाणार असल्याने त्यांची कोंडी होणार हे ओळखून त्यांनी ‘बिद्री’ कारखान्याच्या निवडणुकीपासून त्यांनी आमदार सतेज पाटील यांच्याशी जवळीक वाढवली आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सतेज पाटील यांची भूमिका निर्णायक असणार आहे.