मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचे जलपूजन केले होते. त्या शिवस्मारकाचा शोध घेण्यासाठी संभाजीराजे छत्रपती हे रविवारी स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांसह मुंबईत धडकले. संभाजीराजे गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरातून बोटीने मोदींनी जलपूजन केलेल्या शिवस्मारकाच्या ठिकाणी जाणार होते. यावेळी त्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी काही सवाल करत सरकारवर हल्लाबोल केला. “केंद्रात तुमचं सरकार, राज्यात देखील तुमचं सरकार, स्मारकाचं जलपूजनही तुम्हीच केलं. मग स्मारक का झालं नाही?”, असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी विचारला आहे.
दरम्यान, गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरात पोलिसांनी याठिकाणी संभाजीराजे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अडवून धरल्याने एकच गोंधळ पाहायला मिळाला. यावेळी महाराष्ट्र स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये काहीशी झटापट झाली. पोलीस महाराष्ट्र स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांना गाडीत डांबून ठाण्यात नेत होते. त्यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक होत हस्तक्षेप केला.
माझे कार्यकर्ते हे काही आरोपी नाहीत. त्यांना कुठेही न्यायचे नाही. त्यांना आताच्या आता गाडीतून खाली उतरवा, असे संभाजीराजे यांनी पोलिसांच्या पथकाचे नेतृत्व करत असलेल्या डीसीपी मुंडे यांना सांगितले. त्यानंतर डीसीपी मुंडे आणि संभाजीराजे यांच्यात चर्चा झाली आणि स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सोडून दिले. यानंतर संभाजीराजे यांनी एक छोटेखानी भाषण करत आपली भूमिका मांडली. यानंतर पोलिसांनी संभाजीराजे यांच्यासह 50 जणांना अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे जलपूजन झालेल्या जागेपर्यंत जाण्यास परवानगी दिली.
संभाजीराजे छत्रपती काय म्हणाले?
“आम्ही कोणतेही आंदोलन करण्यासाठी मुंबईत आलेलो नाहीत. खऱ्या अर्थाने आपल्याला अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा विषय हा राज्यातील १३ कोटी जनतेपर्यंत घेऊन जायचा आहे. कोणत्याही प्रकारे आपल्याला कायदा हातात घ्यायचा नाही. कायद्याच्या बाहेर जाऊन कोणतीही गोष्ट आपल्याला करायची नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. ते आपले गडकोट किल्ले व्यवस्थित राहिले पाहिजे. त्यामुळे माझा १५ ते २० वर्षांपासून प्रयत्न सुरु आहे. रायगड किल्ल्यावर रायगड प्राधिकरण स्थापन झालं. त्यासाठी मी सरकारला भाग पाडलं. ७५ वर्षांत पहिल्यांदा रायगड किल्ल्याचं सवर्धन सुरु झालं”, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.