तिसंगी ( प्रतिनिधी ) कोल्हापूर जिल्ह्याचा राजकीय पटलावरील क्षेत्रफळाने छोट्या पण राजकीय इर्षेसाठी प्रसिध्द असणाऱ्या गगनबावडा तालुक्यात आमदारकीपेक्षा जास्त चर्चा सध्या जिल्हा परिषद निवडणुकीची चालू आहे. याला कारण ठरलं माजी पंचायत समिती सभापती बंकट थोडगेंची काँग्रेसमध्ये घरवापसी. तिसंगी जिल्हा परिषदेतून इच्छुक असणाऱ्या बंकट थोडगेंनी मोठ शक्तिप्रदर्शन करत केलेली घरवापसी आमदारकीच्या निवडणूकीत काँग्रेससाठी फायद्याची ठरेल की नाही हे येणार काळ ठरवेल, पण जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळवण्याच्या रांगेत असणाऱ्या बहुसंख्य नेत्यांसाठी माञ डोकेदुखी ठरेल.
गगनबावडा तालुक्यात विशेषत तिसंगी जिल्हा परिषद मतदार संघात कट्टर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या तोंडात येणारा घास अलगद कोणीतरी नव्याने प्रवेश करून हिसकावून घेऊन जातो. या अनुभवामुळे काँग्रेसचे नेते सध्याच्या घडीला शांत असल्याचं पहायला मिळतंय. बंकट थोडगे किंवा अन्य कोणाच्यातरी प्रवेशाने काँग्रेस प्रबळ होताना दिसत असली तरी कट्टर कार्यकर्त्यांच्या मनोबलावर याचा काही अंशी विपरीत परिणाम होताना दिसतोय अन् त्याच्या काँग्रेसला या निवडणूकीत फटका बसू शकतोय असं येथील जानकार मंडळी खासगीत बोलताना दिसत आहेत.
काँग्रेस पक्षात होणाऱ्या इनकमिंगचा फायदा की तोटा याचं गणित येणाऱ्या आमदारकीच्या निवडणूकीत काही अंशी सुटू शकतंय मात्र प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या पदरी येणारा मोठा शून्य राजकारणातील बेडूक उड्या मारणाऱ्या नेत्यांना मिळालं जाणारं अवास्तव महत्व अधोरेखित करून जातोय.