मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा एकतर्फी विजय झालाय. मात्र या निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला. अशातच आज यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रीतीसंगमावर अनेक नेतेमंडळींनी हजेरी लावली होती. शरद पवार ही साताऱ्यात आहेत. तर प्रीतीसंगमावर पवारांच्या तीन पिढ्या यशवंतराव चव्हाणांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित होत्या. शरद पवार, अजित पवार आणि रोहित पवार उपस्थित होते. यावेळी अजित पवार आणि रोहित पवारांची समोर समोर भेट झाली. यावेळी थोडक्यात वाचलास, दर्शन घे दर्शन, असं म्हणत अजित पवारांनी रोहित पवारांना मिश्किल टोला लगावला. यावेळी रोहित पवार यांनी अजित पवार यांचे पाया पडून आशीर्वाद घेतले.
दरम्यान, रोहित पवार समोर आल्यानंतर अजित पवारांनी त्यांना हस्तालोंदन केलं आणि त्यांना काकाच्या पाया पड, असं म्हणत खाली वाकून नमस्कार करण्यासाठी आग्रह केला. रोहित पवारांनी क्षणाचाही विलंब न लावता, अजित पवारांना खाली वाकून नमस्कार केला. त्यानंतर रोहित पवारांना निवडून आल्याबद्दल अजित पवारांनी अभिनंदन केलं आणि थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर, काय झालं असतं विचार कर… असा टोलाही अजित पवारांनी रोहित पवारांना लगावला.
रोहित पवार यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली. अजित पवार माझे काका आहेत त्यामुळे मी त्यांच्या पाया पडलो. विचारांमध्ये भिन्नता अजूनही आहे. माझ्या 2019 च्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मला खूप मदत केली होती. पाया पडणे माझी जबाबदारी होती. आम्ही संस्कृती पाळली. तसेच अजित पवारांच्या सभे विषयी रोहित पवारांना विचारले असता नक्कीच अजित पवारांनी सभा झाली असती तर वर-खाली झालं असतं, उलटंही होऊ शकलं असतं. पण ते बारामतीमध्ये अडकून पडले होते, त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही. शेवटी अजित पवार मोठे नेते आहेत, निर्णय त्यांचा होता. त्यांचे आमदार देखील मोठ्या प्रमाणात निवडून आले आहे. चांगली गोष्ट आहे, मी त्यांचे अभिनंदन देखील केलं, असं रोहित पवार यांनी सांगितले.