कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये कोल्हापूर दक्षिण आणि उत्तर विधानसभा मतदारसंघावरून कलगीतुरा रंगला असतानाच जिल्ह्यातील राजकीय विद्यापीठ समजले जाणाऱ्या कागल विधानसभा मतदारसंघात जोरदार घमासान सुरु आहे. या मतदारसंघातून शिंदे गटाचे माजी खासदार संजय मंडलिक यांचे चिरंजीव वीरेंद्र मंडलिक यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात शड्डू ठोकल्याने राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र वीरेंद्र मंडलिक यांनी घेतलेल्या भूमिकेवरून माजी खासदार संजय मंडलिक यांनी वेगळी भूमिका घेतल्याने पिता-पुत्रामध्ये मत मतांतरे असल्याचे समोर आले आहे.
बामणी फाटा (ता. कागल) येथे शिवसेना युवासेना पदाधिकारी निवडीच्या निमित्ताने आयोजित भगवा मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना माजी खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उमेदवारीला विरोध करत स्वतः निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे संकेत दिले. यावेळी वीरेंद्र मंडलिक यांनी कोल्हापूर लोकसभेच्या पराभवाचे खापर त्यांनी मंत्री मुश्रीफ आणि समरजित यांच्या माथी मारले आहे. तशी बॅनरबाजीही कागल मतदार संघात मंडलिक गटाकडून करण्यात आली आहे. त्यामुळं महायुतीतील वाद आता चव्हाट्यावर आला आहे.
वीरेंद्र मंडलिक यांनी मेळावा घेत कागलमधून निवडणूक लढण्याची तयारी असल्याचे म्हटलं आहे. इतकेच नव्हे तर प्रस्थापितांच्या विरोधात लाट असल्याने या लाटेचा फटका हसन मुश्रीफ यांना बसू शकतो, असेही वीरेंद्र मंडलिकांनी म्हटलं होतं. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीमध्ये या दोन्ही नेत्यांकडून संजय मंडलिक यांना अपेक्षित मदत झाली नाही असाही आरोप त्यांच्याकडून करण्यात आला. मात्र संजय मंडलिक यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे कागल मतदार संघात मंडलिक पिता-पुत्रांमध्ये एकी नसल्याच्या चर्चा मतदार संघात सुरु आहेत.
वीरेंद्र मंडलिक यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे संजय मंडलिक कोणती भूमिका घेतात? याकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र वीरेंद्र मंडलिक यांच्या मेळाव्यानंतर माजी खासदार संजय मंडलिक हे गुरुवारी (दि. १०) हसन मुश्रीफ यांच्या व्यासपीठावर दिसून आले. त्यामुळे दोघांच्या भूमिकेवरून आता मतदार संघात उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. मंत्री मुश्रीफांच्या व्यासपीठावरून बोलताना संजय मुंडलिक यांनी मुश्रीफ यांना अत्यंत ताकतीने मदत करा, असं आवाहन केलंय. कागल तालुक्यातील मौजे सांगावमध्ये झालेल्या जाहीर सभेमध्ये संजय मंडलिक यांनी हसन मुश्रीफ यांना मदत करण्याचा आवाहन केलं. त्यामुळं वीरेंद्र मंडलिकांनी घेतलेल्या भूमिकेचं काय? अशा चर्चा आता कार्यकर्त्यांमध्ये रंगल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या आधीच कागल मतदार संघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय बाबा घाटगे आणि माजी खासदार संजय मंडलिक यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना जाहीर पाठींबा दिला आहे. मतदार संघात होत असलेल्या अनेक कार्यक्रमात मंत्री मुश्रीफांच्या व्यासपीठावर घाटगे आणि मंडलिक यांची उपस्थितीत असतेच. पण वीरेंद्र मंडलिक यांनी मंत्री मुश्रीफ यांच्या विरोधात घेतलेली भूमिका कायम राहणार ? की वीरेंद्र मंडलिक यांची समजूत काढली जाणार ? जर वीरेंद मंडलिक भूमिकेवर ठाम राहिले तर माजी खासदार संजय मंडलिक काय भूमिका घेणार ? याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. त्यामुळं येणारा काळच सांगेल की निवडणूक दुरंगी होणार का तिरंगी ?