मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा सहभाग असावा, असा पोलिसांचा संशय असून त्या दृष्टीने त्यांचा तपास सुरू आहे. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास वांद्रे येथील खेरवाडी जंक्शनजवळ बाबा सिद्दीकींवर तीन अज्ञातांनी गोळीबार केला. लिलावती रुग्णालयात बाबा सिद्दीकींना दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील पिस्तूल पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे.
9.9 MM गनने सिद्दीकींवर गोळीबार झाल्याची माहिती असून दया नायक यांच्याकडे तपासाची सूत्र सोपवण्यात आली आहे. सकाळी 8 वाजता शवविच्छेदनाला सुरुवात होणार आहे. याची व्हिडिओग्राफी करण्यात येणार आहे. या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडूनही चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
हत्येची जबाबदारी स्विकारावी : राहुल गांंधी
प्रकरणी आता राज्यासह देशभरातील राजकारण्याची प्रतिक्रिया समोर येत आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी बाबा सिद्दिकी यांच्या हत्येवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी सरकारने बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी स्विकारावी, असे राहुल गांधी यांनी म्हटले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्सच्या माध्यमातून बाबा सिद्दिकी यांच्यावर हत्येवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यानुसार, “बाबा सिद्दीकीजी यांचं निधन धक्कादायक आणि दुःखदायक आहे. या कठीण काळात माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. या भीषण घटनेने महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचं दिसून येत आहे. सरकारने याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिजे” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
तर शरद पवारांनी, राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे. बाबा सिद्दिकी यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो.
कशी झाली हत्या?
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी गोळीबार झाला, तिथे फटाके वाजत होते. स्फोटाचा आवाज झाला यानंतर बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. आवाजामुळे सिद्दिकी यांना गोळ्या लागल्याचं इतरांना कळालंच नाही. घटनेची माहिती मिळताच बाबा सिद्दिकी यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहचेपर्यंत मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. गोळी शरीरातच अडकली होती. त्यामुळे रुग्णालयाचा नेण्यापूर्वीच त्यांचा मृ्त्यू झाल्याची माहिती मिळत आहे.