कोल्हापूर ( प्रतिनिधी ) दिनांक 7 सप्टेंबर 2024 ते दिनांक 17 सप्टेंबर 2024 या कालावधीत जिल्ह्यामध्ये गणेशोत्सव सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. या काळात सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाकडून मोठ्या प्रमाणात मिरवणुकांचे आयोजन केले जाते. या मिरवणुकीमध्ये गणेश मंडळ लेझर लाईटचा वापर मोठ्या प्रमाणात करीत आहेत. लेझरमुळे डोळ्यांना इजा पोहचत असल्याने मिरवणुकीमध्ये लेझर लाईट वापरास प्रतिबंध करण्यात आला असून तरी देखील वापरण्यात आल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.
लेझरमुळे डोळ्यांना इजा पोहचत असल्याने मिरवणुकीमध्ये लेझर लाईट वापरास प्रतिबंध करणे आवश्यक आहे. त्यामुळे असा वापरकरण्यात आल्यास अशा सार्वजनिक गणेश मंडळावर कारवाई करण्यात येणार आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (1) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी दिनांक 12 सप्टेंबर 2024 ते दिनांक 17 सप्टेंबर 2024 या कालावधीत सार्वजनिक गणेश मंडळाकडून मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापरास प्रतिबंध केले आहे. या आदेशाचे सर्व मंडळांनी पालन करावे असे आवाहनही प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती फौजदारी कारवाईस पात्र राहणार आहेत.