कोल्हापूर : काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी कोल्हापुरात दाखल झाले आहेत. यावेळी विमानतळावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, गटनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह विधानपरिषद गटनेते सतेज पाटील यांनी राहुल गांधी यांचे स्वागत केले. आजपासून ते कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र, राहुल गांधी यांच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कालचा (दि. ४ ) कोल्हापूर दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे कालचा पुतळा लोकार्पण सोहळा आज सकाळी होणार आहे.
दरम्यान, कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अनावरण आणि संविधान सन्मान संमेलनाचे आयोजन काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी केले आहे. देश आणि राज्यातून आलेल्या प्रतिनिधींसमोर पुन्हा एकदा संविधान सन्मान संमेलनात पुन्हा एकदा संविधानाचा मुद्दा मांडण्यावर गांधी यांचा भर असणार आहे. दरम्यान, पुतळ्याचे लोकार्पण पार पडल्यानंतर राहुल गांधी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन करणार आहेत. यानंतर संविधान संमेलन कोल्हापूर येथील सयाजी हॉटेलमध्ये होणार आहे. या ठिकाणी ते बाराशे निमंत्रितांसोबत विचार मंथन करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संविधान हा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी राहणार आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर उद्या राहुल गांधी संविधान संमेलनातून कोणती भूमिका घेत महाराष्ट्राच्या निवडणुकीला सामोरे जाणार याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल. राहुल गांधी यांनी कोल्हापूर निवडण्यामागे सुद्धा रणनीती असल्याचे बोलले जात आहे. छत्रपती शाहू महाराजांना आरक्षणाचे जनक म्हणून संबोधले जाते. वंचितांना न्याय देण्याचं सर्वप्रथम काम शाहू महाराजांनीच केलं होतं. त्याच भूमीतून समतेचा नारा पुन्हा एकदा बुलंद करण्यासाठी राहुल गांधी यांनी कोल्हापूरची निवड केल्याचं बोलत जात आहे. त्यामुळे एक प्रकारे याच दौऱ्यातून महाराष्ट्रातील निवडणुकीचे रणशिंग सुद्धा फुंकले जाईल यामध्ये शंका नाही. दरम्यान, राहुल गांधी कोल्हापूर दौऱ्यावर येत असल्याने काँग्रेस नेत्यांची दिगज फौज कोल्हापूरमध्ये आली आहे.
सीमा भागातील नेते सुद्धा आपण या दौऱ्यासाठी तयारी करत आहेत. राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. कोल्हापुरात शाहू नाक्यापासून ते कावळा नाक्यापर्यंत त्यांच्या स्वागतासाठी बॅरिकेड्स लावण्यत आले आहेत. शहरांमध्ये सुद्धा जागोजागी कटआउट्स लावून वातावरण निर्मिती करण्यात आली आहे.