मुंबई : राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात केलेल्या एका विधानामुळे विधानसभा निवडणुकीआधी महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसशी आपले आयुष्यभर पटले नाही. आता त्यांच्याबरोबर सत्तेत मांडीला मांडी लावून बसलो आहे. पण बाहेर आलो की उलट्या होतात, असे वादग्रस्त विधान तानाजी सावंत यांनी एका जाहीर कार्यक्रमात केले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले असून तानाजी सावंत यांचे ऐकून घेण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडलेले बरे, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे.
“काँग्रेस, राष्ट्रवादीचं आणि माझं कधी जमलेलं नाही. हे वास्तव आहे. कारण ते विचार परिपूर्ण अंगात भिनलेले आहेत. त्यामुळे ते शक्य आहे. आज जरी आम्ही कॅबिनेटला मागे राहून बसलो असलो तरी बाहेर जावून आम्हाला उलट्या होतात. सहन होत नाही. ते आता वयाच्या 60 व्या वर्षी माणूस बोलू शकत नाही”, असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं.
सत्तेतून बाहेर पडा
“तानाजी सावंत हे बहुजन समाजाचे शिक्षण क्षेत्रात अतिशय उत्तुंग कामगिरी केलेले व्यक्तीमत्व आहे. शुन्यातून विश्व निर्माण केल्याचा व्यक्ती म्हणून आम्हालाही त्यांचा अभिमान वाटायचा. पण त्यांची अशी ही वक्तव्ये ऐकल्यानंतर आम्हाला सुद्धा त्यांची लाट वाटते. ही काय बोलण्याची भाषा झाली? या पद्धतीने तानाजी सावंत किंवा आणखी कुणी बोलणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ऐकून घेणार नाही. माझी त्यामुळे माझ्या वरिष्ठ पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे की, आपण स्वाभिमानी आहोत. आपण काही कुणाच्या घरचं खात नाहीत. त्यामुळे अशा पद्धतीने ओकारीची भाषा करणारा तानाजी सावंत यांना बाहेर काढा नाहीतर आम्ही तरी बाहेर पडू”, असं उमेश पाटील म्हणाले.
“केंद्रात भाजपचं सरकार आहे, आणि राज्यात केंद्र आणि राज्य यांच्या समन्वय राहावं, एकाच विचाराचं सरकार राहावं, लोकप्रतिनिधींना आपापल्या मतदारसंघात जी काम करायची असतात त्यासाठी केंद्रातील सरकार आपलं असणं अत्यंत आवश्य आहे, महाराष्ट्राच्या विकासाकरता अजित दादांनी महायुतीसोबत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. जवळपास ४३ आमदारांनी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी दूरदृष्टी ठेवून अजित दादांना सोबत घेतलं. भाजपने शिवसेनेचे कमी आमदार असतानासुद्धा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्याने तानाजी सावंत मंत्री झाले”, अशी प्रतिक्रिया उमेश पाटील यांनी दिली.
भरत गोगावले काय म्हणाले?
“तानाजी सावंत कोणत्या अर्थाने बोलले ते आम्हाला विचारावं लागेल. आपण तिघांनी पुढे एकत्र लढायचं आहे. त्यातून आरोग्य मंत्री यांना उलट्या येत असतील तर ते स्वत: आरोग्य मंत्री आहेत. त्यांनी त्याचं औषध घ्यावं. आरोग्य मंत्र्यांनी असं चुकीचं वक्तव्य करु नये. हे चुकीचं आहे. त्यांना जमत नसेल तर त्यांनी गप्प बसावं. कुणाला उल्टी येत असेल, ताप येत असेल, त्यांनी असं वक्तव्य करु नये, याबाबत आम्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करु”, असं म्हणत भरत गोगावले यांनी मंत्री तानाजी सावंत यांना घरचा आहेर दिला.