कोल्हापूर : लोकराजा ऊर्जा मैत्री परिवार आयोजित काव्यांगण 2024 निमंत्रितांचे कवी संमेलन शनिवारी (दि. 5 ऑक्टोबर) शिवाजी विद्यापीठाच्या वि. स. खांडेकर भाषाभवन सभागृहात मोठ्या उत्साहत पार पडले. उद्घाटन सत्रानंतर काव्य संमेलनाला सुरुवात झाली. यावेळी कवींनी प्रेम कवितांबरोबर, सामाजिक, राजकीय परिस्थितीवर भाष्य करत शब्दांचे निखारे फुलविणाऱ्या कवितांनी उपस्थितांची माने जिंकली. जवळपास तीन तासाहून अधिक काळ कवींची मैफिल रंगली होती. कवींनी सादर केलेल्या प्रेमाच्या, सामाजिक संदर्भाच्या कवितेसह ‘इलेक्शन डोक्यावरी, सुरू करा गाजराची शेती’ यासारख्या काव्यपंक्तीतून सध्यस्थितीवर भाष्यही केले.
दरम्यान सुरुवातीला डॉ. माया पंडित-नारकर यांच्या हस्ते आणि साहित्यिक सुनीलकुमार लवटे यांच्या अध्यक्षतेखाली काव्यांगणचे उद्घाटनाचा पार पडले. तर उद्घाटन सोहळयासाठी उपस्थिती दर्शविलेले इचलकरंजी येथील पोलिस उपअधीक्षक समीर साळवे यांनी ‘कणाकणांनी क्षणांक्षणांनी बहरत जा तू नव्या चेतना, नव्या उमेदी रुजवत जा तू’ही कविता सादर करत काव्यांगण मैफलीला सुरुवात केली. यानंतर निमंत्रित कवींनी व्यासपीठाचा ताबा घेतला आणि आपल्या कवितांनी जवळपास तीन तास रसिकांना मंत्रमुग्ध केलं
तुझ्या नाजूक हातात सखे चुडा ही नाजूक…
तर अंबेजोगाईचा कवी अविनाश भारती यांनी प्रेमावर आधारित चुडा कविता सादर केली. त्यांनी म्हटलेल्या ‘तुझ्या नाजूक हातात सखे चुडा ही नाजूक, माझी नजर भावूक त्याला सारेच ठावूक !’या कवितेने उपस्थित रसिकांच्या मनाच्या तारा छेडल्या. तर मुंबईच्या यामिनी जाधव यांनी शेर, गझल आणि कवितेतून सभागृहात प्रेमाचा माहोल तयार केला. त्यांच्या, ‘सुखाला आज माहेरी पुन्हा परतायला सांगू-ऋतू गायला सांगू तिलाही यायला सांगू !’ या साद घालणाऱ्या कवितेला तरुणांनी जोरदार दाद दिली. “कुठे काही विसरले, जर मला भेटून जाताना -लगोलग हात माझा धर मला भेटून जाताना कशाला एवढी घाई -चुकव ट्रेन एखादी, जरा रेंगाळ ओठावर-मला भेटून जाताना !!’’ त्यांच्या या कवितेला प्रचंड दाद मिळाली.
कवी उमेश सुतार यांची ‘प्रेम म्हणजे कोणासाठी फुलापानांची दरवळ असते, प्रेम म्हणजे कोणासाठी ओली ओली हिरवळ असते’ प्रेमाचा अनोखा स्पर्श देऊन गेली. इचलकरंजीचा रोहित शिंगे यांनी प्रेमिकांची अवस्था शब्दबद्ध केली. ‘लई दिसाचं सपान कसं कुशीत आलय, एका पाखराच्या नावे माझं काळीज केलय’ या कवितेला सभागृहांनी टाळयांच्या गजरात दाद दिली. राधानगरीतील विश्वास पाटील यांनी वर्तमान इतिहासात असता तर या सामाजिक आशयाची कविता सादर केली. सध्याच्या घडामोडीवर आधारित या कवितेने रसिकमनाला अंतर्मुख बनविले.
कवी नारायण पुरींच्या कवितेला रसिकांची उभं राहून दाद
नांदेड येथील नारायण पुरी यांच्या ‘प्रेमाचा जांगडगुत्ता गं’या कवितेने काव्यांगणच्या मैफलीला वेगळ्या उंचीवर नेले. देशातील सध्य स्थिती, जातीधर्माचे राजकारण, सत्तेसाठी पक्ष फोडाफोडी, विविध योजनांचा भडिमार यावर अतिशय परखडपणे भाष्य करणाऱ्या रचना सादर करत पुरी यांना उपस्थितांना खळखळून हसविले, सोबतच अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडले.