मुंबई : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे निधन झाले आहे. सचोटी आणि विश्वासाच्या भक्कम पायावर उभी असलेली भारताची निरलस उद्यमशीलता म्हणते ‘टाटा’. देशात विश्वासार्ह आणि प्रामाणिक उद्यमशीलता आणणाऱ्या टाटा कुटुंबातील रतन टाटांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला.
86 वर्षीय रतन टाटा यांना 06 ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागले होते. रक्तदाब कमी झाल्याने आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने रतन टाटा यांना तत्काळ ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू असून डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर प्रकृतीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती समोर आली होती. मात्र या वृत्तानंतर रतन टाटा यांनी स्वतःच X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून आपली प्रकृती ठीक असल्याची माहिती दिली होती. तसेच वाढत्या वयामुळे नियमित आरोग्य तपासणीसाठी आपण रुग्णालयात दाखल झाल्याचे त्यांनी पोस्टच्या माध्यमातून म्हटले होते.
रतन टाटा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले होते की, माझ्या प्रकृतीबाबत पसरत असलेल्या अफवा माझ्या कानावर आल्या आहेत. हे सर्व दावे निराधार आहेत. वाढत्या वयोमानामुळे नियमित आरोग्य तपासणीसाठी मी रुग्णालयात दाखल झालो आहे. चिंता करण्याची आवश्यकता नाही. मी बरा आहे. प्रसारमाध्यमे तसेच समाजमाध्यमांवरील चुकीच्या माहितीपासून दूर रहा आणि तुम्हीही अशा बातम्या पसरवू नका, अशी विनंतीच त्यांनी त्यांच्या या पोस्टच्या माध्यमातून केली होती. मात्र रतन टाटा यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवसांपूर्वीच मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने आज दिले होते. यानंतर आता त्यांच्या मृत्यूची माहिती समोर येत आहे.
रतन टाटा यांची कारकिर्द
रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला होता. एक सामान्य कर्मचारी म्हणून 1961-62 मध्ये रुजू झाले. त्यानंतर जेआरडी टाटांनी त्यांना टाटा ग्रुपचं चेअरमनपद सोपवलं. चेअरमनपद हाती घेतल्यानंतर समूहातील सर्व कंपन्यांमध्ये टाटांची स्वतःची हिस्सेदारी वाढवली. 1998मध्ये संपूर्णपणे भारतीय बनावटीची ‘इंडिका’ कार टाटा मोटर्सने बनवली. त्यानिमित्ताने रतन टाटा यांचं स्वप्न पूर्ण झालं होतं. एका कुटुंबाला मोटारसायकलवर प्रवास करताना पाहून स्वस्तात कार बनवण्याची कल्पनाही त्यांना सुचली.
टाटांच्या मार्गदर्शनात 2008मध्ये रतन टाटा मोटर्सने टाटा नॅनो बाजारात आणली. त्यांनी 2012मध्ये टाटा सामूहाच्या चेयरमनपदाचा राजीनामा दिला आणि सायरस मेस्त्रीकडे पदभार दिला. मेस्त्रीसोबतच्या वादानंतर 2016 मध्ये पुन्हा वर्षभर टाटा समूहाच्या चेयरमनपदी ते आले. नटराजन चंद्रशेखरन हे सध्या टाटा समूहाचे चेयरमन आहेत. रतन टाटांच्या पश्चात धाकटे भाऊ जिम्मी टाटा, नोएल टाटा हे दोन भाऊ आहेत. तर नोएल टाटा यांना लेह टाटा, माया टाटा, नेव्हिल टाटा ही 3 मुले आहेत