कोल्हापूर : लोकसभेचा पराभव मंडलिक गटाच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. मंडलिक गटाने मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात मतदारसंघात बॅनर बाजी केली आहे. यामुळं मतदारसंघातील राजकीय डावपेच दिवसेंदिवस बदलताना दिसत आहेत. तर शिंदे गटाचे माजी खासदार संजय मंडलिक यांचे चिरंजीव वीरेंद्र मंडलिक यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. त्यांनी थेट मुश्रीफ तुम्ही थांबा असे म्हणत आव्हान दिलं आहे. वीरेंद्र मंडलिक यांनी मेळाव्यामध्ये मुश्रीफ यांच्यासह समरजितसिंह घाटगे यांच्यावरही टीका केली होती.
दरम्यान, कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये गावोगावी कट्टर मंडलिक प्रेमींकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. यामध्ये हसन साहेब, समरजितराजे, काय काय केलात तुम्ही हे विसरणार नाही आम्ही. बॅनरवर कट्टर मंडलिक प्रेमी असाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये समरजित आणि मुश्रीफ यांची लढाई सुरु असतानाच महायुतीमध्ये सुद्धा वादाला तोंड फुटल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे.
मंगळवारी मंडलिक गटाचा मेळावा पार पडल्यानंतर कार्यकर्त्यांसह वीरेंद्र मंडलिक यांनी महाविकास आघाडीच्या संभाव्य उमेदवारापेक्षा महायुतीचेच उमेदवार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर रोष असल्याचे दाखवून दिले. मंडलिक यांनी आपल्या उमेदवारीची घोषणा केल्यानंतर गावागावातील मंडलिक प्रेमी आता मुश्रीफ आणि घाटगे यांच्या विरोधात उघड उघड रस्त्यावर उतरलेले आहेत.
गावागावात लावलेल्या बॅनरवर हसन साहेब…, समरजितराजे काय काय केलंय तुम्ही? हे विसरणार नाही आम्ही. अशी बॅनरबाजी करत थेट आव्हान दिलं आहे. येणारे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंडलिक गटाकडून दबाव तंत्र वापरले जात आहे. या बॅनरबाजीमुळे विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा उफाळण्याची शक्यता आहे.