कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूरातील एक गद्दार माजी आमदाराचे शिवसेनेचे दुकान लवकर बंद होईल, यांचे हिंदुत्व बेगडी आहे, सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी अभद्र युती केली अशी टिका केली होती, वास्तविक आरोप करताना तुम्हाला मिळालेला मानसन्मान हा निव्वळ हिंदुहदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे साहेब व तमाम निष्ठावंत शिवसैनिकांमूळे मिळाला हे विसरू नका. जनाची नाहि, मनाची तरी बाळगा असे शिवसेना उपनेते जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी म्हटलं आहे.
संजय पवार यांनी आपल्या पत्रकात आरोप करताना म्हटलं आहे की, या आत्तापर्यंत उपभोगताय हे फक्त मातोश्रीचा अशिर्वाद याची जाण ठेवा. पराभूत होऊनसुध्दा उध्दवसाहेबांनी तुम्हाला राज्यनियोजनचे पद व कॅबीनेट मंत्रीपद देऊन तुमचे राजकीय पुनःर्वसन केले हे सर्व कोल्हापूरकरांना माहिती आहे. अभद्र युती केली, हिंदुत्व सोडले, असे म्हणणाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाबरोबर मांडीला मांडी लावून घटनाबाहय सरकार चालवले हे सर्व महाराष्ट्राला ज्ञात आहे, भाजपाचे नेते व नामदार चंद्रकांत पाटलांवर अनेक गंभीर आरोप करून ई. डी ची चैकशी लावा म्हणणारे हेच महाशय होते.
नरेंद्र मोदींची लाट नव्हे हे तर महापूरातून वाहून आलेले ओंडके आहेत, असे वक्तव्य याच गद्दारांनी केले होते, हे भाजपा विसरली आहे का? आपण जे काही कोल्हापूरातील अनेक घटकांना व कुटुंबावर सत्तेचा दुरूपयोग करून विनाकारण त्रास दिला आहे हे कोल्हापूरकर कदापीही विसरणार नाहित. निष्ठावंत शिवसैनिकांवर व ज्या मशालीवर तुम्ही टिका केलीत तिच मशाल या निवडणूकीत तुमच्या बुडाखाली लावून तेच निष्ठावंत शिवसैनिक तुमचा पराभव करतील. आपण सत्तेच्या, पैशाच्या , आणि दादागिरीच्या जिवावर सर्वकाही विकत घेऊ शकाल पण स्वाभिमानी कोल्हापूरकरांना विकत घेऊ शकणारा अजून पैदा झाला नाही हे लक्षात ठेवावे.
ज्या निष्ठावंत शिवसैनिकांवर माणसे जमत नाहीत अशी टिका करत आहात त्याच निष्ठावंत शिवसैनिकांमुळे तुम्ही दोन वेळा आमदार झालात, याच शिवसैनिकांनी रात्रीचा-दिवस करून तुम्हाला विजयी केले हे लक्षात ठेवा. वापरा आणि फेकून द्या हे तुमचे धोरण सर्व कोल्हापूरकरांना माहिती आहे, आणि आता स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही याच शिवसैनिकांपुढे लोटांगण घालत आहात. आम्ही कधीही भाडेतत्वावर व अमिषे दाखवून माणसे जमा केली नाहीत व करणारसुध्दा नाही. कारण छत्रपती शिवरायांनी सुद्धा मूठभर निष्ठावंत मावळे घेऊन स्वराज्य स्थापन केले होते हे विसरू नका. असे ही पवार यांनी आरोप करताना म्हटले आहे.