दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने ते जवळपास 156 दिवसांनंतर तिहार तुरुंगातून बाहेर आले. अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली होती. अखेर सीबीआयच्या या प्रकरणात काल सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. आपच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भर पावसात काल तिहार तुरुंगाबाहेर गर्दी करत अरविंद केजरीवाल यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. यावेळी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवाल भर पावसात भाजपवर बरसले.
यावेळी बोलताना केजरीवाल यांनी, “मी देशविरोधी शक्तींविरोधात लढत राहणार आहे. या लोकांनी मला तुरुंगात पाठवले. मात्र तुरुंगाच्या भिंती मला कमकुवत करू शकल्या नाहीत. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर माझी ताकद 100 पटीने वाढली आहे.”
मी देवाला प्रार्थना करतो की, जशी देवाने मला आजपर्यंत शक्ती दिली आहे, तसाच देवाने मला मार्ग दाखवावा. मी देशसेवा करत राहो. अशा अनेक देशविरोधी शक्ती आहेत, ज्या फूट पाडण्याचे काम करत आहेत. ते देशाला कमकुवत करतात, मी आयुष्यभर त्यांच्याविरुद्ध लढत राहीन.
अरविंद केजरीवाल यांना अटक कधी झाली ?
केजरीवाल यांना ईडीने 21 मार्च रोजी अटक केली होती. 10 दिवसांच्या चौकशीनंतर त्यांना 1 एप्रिल रोजी तिहार तुरुंगात पाठवण्यात आले होते. 10 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी 21 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यानंतर 2 जून रोजी त्यांना आत्मसमर्पण करावे लागले होते. त्यानंतर 12 जुलै रोजी त्यांना ईडी प्रकरणात जामीन मिळाला. मात्र त्यानंतर सीबीआयने त्यांना अटक केली.