आबिटकरांना कानपिचक्क्या ! भोगावतीच्या शेतकऱ्याची पोस्ट तुफान व्हायरल

बिद्री कारखान्याची रणधुमाळी जोरात चालू आहे . बिद्री कारखाना हा कर्जमुक्त असून पलीकडच्या बाजूला भोगावती वर ५३९ कोटीचे कर्ज आहे आमदार आबिटकर बिद्री कारभारावर जाधव गुरुजी ना पुढे करत टीका करत आहेत मात्र एका भोगावती कारखान्याच्या सभासद शेतकऱ्याने भोगावतीच्या व्यथा मांडत राधानगरी चे तुम्ही आमदार आहात तर तुम्ही भोगावतीवर का बोलत नाही असा  तिखट प्रश्न विचारात भोगावतीचा लेखा जोखा मांडत कानपिचक्या दिल्या आहे 

व्हायरल होणारी पोस्ट पुढीलप्रमाणे :


आ.प्रकाश आबिटकर साहेब यांना,५० वेळा जय महाराष्ट्र !

साहेब, आपण शिंदे गटात गेल्यापासून राधानगरी मतदार संघातील प्रत्येक घराला सोन्याच्या खापऱ्या बसल्या आहेत.त्या बद्दल धन्यवाद! साहेब…के.पी.पाटील यांनी बिद्री साखर कारखाना चांगला चालविलेला आहे हे आमच्याकडेच नव्हे तर जिल्हाभर बोलले जाते.आणि ते खरेही आहे.तरीपण अतिमहत्वकांक्षेपोटी आपण त्यांच्यावर आरोप व खोटे गुन्हे दाखल करत आहात. महाराष्ट्रात उच्चंकी ऊस दर दिलेल्या के.पी.पाटलांना आपण शासकीय यंत्रणा वापरून अटक करण्याची भाषा करत आहात. तुम्ही आमदार असल्यामुळे कदाचित तुम्हाला हे सर्व सोपे वाटते. पण हे जनतेला किती रुजणार. पेटलेल्या चुलीत पाणी ओतणे हा आपला स्वभाव असेल.आपण एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहात (?) म्हणून मतदार संघातील प्रत्येक गोष्टीवर आपले बारकाईने लक्ष असते.पण,भोगावतीवरुन जाताना आपला चष्मा बहुतेक काढून ठेवलेला असतो.साहेब..आपणास विनंती आहे, जरा आमच्याकडेपण लक्ष द्या.चांगला चाललेल्या बिद्रीत एवढे आरोप तर भोगावतीच्या बाबतीत दुर्लक्ष का??? शेकडो कोटींचे कर्ज,६२ महिने साखर नाही, कामगार पगार नाही,१९ लाख टन उसाची साखर नाही,२०१७ चे २००/- ऊसबील नाही.साखर चोरी, ताडपत्री चोरी अशी कित्येक प्रकरणे असताना तुम्ही गप्प का?? म्हणजे तुम्हाला आमची काळजीच नाही म्हणायचे का?? बघा विचार करा एकाच मतदार संघात चांगल्या चाललेला कारखान्याच्या संचालककांवर चिखलफेक करता आणि बुडत चाललेल्या कारखान्याच्या बाबतीत मात्र अळी,मिळी गोमचिळी..हाताची घडी तोंडावर बोट!! बघा जरा विचार करा आणि आमचा विचार करा.


आपलाच,

संदिप पाटील बिद्री 

भोगावती सभासद