साखर कवा देणार ते सांगा … मगच मतं मागा

कौलव : प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना सत्ताधाऱ्यांची सभासद आता अक्षरशः दमछाक करीत आहेत असे चित्र गावागावात दिसते. करवीर तालुक्यातील शहराजवळच्या एका गावात सत्ताधारी आघाडीची संपर्क मोहीम सुरू होती. सर्व उमेदवार आणि नेतेमंडळी गावाच्या वेशीत चार चाकी गाड्या लावून पायी चालत सभासदांना भेटत होती. ही मंडळी पुढे जात होती आणि मागे शेतकरी, सभासद कुजबूज करीत होते. त्यातल्या एकानं इतरांना सांगितलं…. आता ही गेलेली मंडळी याच वाटेने परत येऊ द्यात, त्यांना आमच्या हक्काच्या साखरेचं विचारायचंच ! बाकीच्यांनीही लगेच हो म्हटलं. गावात फेरी काढून त्याच वाटेने गाड्या लावलेल्या दिशेने नेतेमंडळी आणि उमेदवार माघारी फिरत असताना दहा -वीस जणांच्या सभासदांच्या या ग्रुपने थेट सवालच केला…. तुम्ही मत मागायला आला हा तुमचा जसा हक्क आहे, तशी आमची साखर हा आमचा हक्क आहे. आमच्या साखरेचा उपयोग ज्यासाठी करायचा ते तुमचे चिन्ह रिकामेच आहे. आम्ही साखर विकत घेऊन चहा पितो, मग या तुमच्या चिन्हाचा आम्हाला काय उपयोग ? आधी आमची हक्काची साखर कवा देणार ते सांगा …… 

 आणि मगच आमच्याकडं मतं मागा …..

या अचानक झालेल्या संवादामुळे सगळेच गडबडून गेले आणि या प्रश्नाला उत्तर न देता नुसते हसत हातवारे करीत आपापल्या गाडीत बसून पुढच्या गावाकडे सारे जण निघून गेले.