‘भोगावती’ वाचविणारच : धैर्यशील पाटील कौलवकरांचा ठाम निर्धार

भोगावती गव सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक दादासाहेब पाटील- कौलवकर यांचा मी नातू आहे. इतर नेते मंडळींशी माझे काही देणे-घेणे नाही; परंतु भोगावती कारखाना ज्यांनी स्थापन केला त्या आजोबांची शपथ घेऊन सांगतो हा भोगावती साखर कारखाना सर्वसामान्य सभासदांच्या बळावर मी वाचविणारच, असा ठाम निर्धार ‘भोगावती ‘ माजी अध्यक्ष व दादासाहेब पाटील- कौलवकर आघाडीचे प्रमुख नेते धैर्यशील पाटील-कौलवकर यांनी केला.

आज कौलवकर आघाडीच्या जाहीर प्रचाराचा प्रारंभ घोटवडे (ता.राधानगरी) येथील स्वयंभू मंदिर परिसरात झाला. याप्रसंगी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कामगार नेते बळी पाटील-सिरसेकर होते.

old vechical loan tractor car jcb

धैर्यशील पाटील पुढे म्हणाले,” भोगावतीची निवडणूक एकदाही न लढविलेल्या सर्वसामान्य सभासदांना उमेदवारी देत  स्वर्गीय दादासाहेबांची पुण्याई सोबत घेऊन या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत.  यापूर्वीच्या आमच्या सत्ता काळात ऊस उत्पादकांची सर्व बिले,कामगारांचे पगार तोडणी -ओढणीची सर्व बिले, व्यापारी देणी वेळेत देऊन आम्ही सत्तेतून पायउतार झालो होतो. त्यावेळी आधीच्या कारभारातील १४ हजार टनांचे ऊसबिल, कामगारांचे पगार, बोनस थकीत होते.  अन्य बिले व देणी थकीत होती. हे आर्थिक गणित जुळविण्यासाठी आम्ही आमच्या जमिनी गहाण ठेवल्या; परंतु मागील देण्यासह  सर्व देणी भागविली. शिवाय कारखान्याच्या इतिहासात १३.२०  इतकी उच्च रिकव्हरी आणि एका दिवसाला तब्बल ५४३० टन आणि एकूण हंगामात ६ लाख ५४ हजार इतके विक्रमी क्रशिंग केले. डिस्टिलरी बंद होती, ती आम्ही ओपन टेंडर काढून चालविण्यास दिली.

 त्यानंतरचा कारभार मात्र तुम्ही सर्वजण जाणता आहात. सध्या १५ लाख रुपयांचे दिवसाला बँकांना देणे लागते.  साखरेचे टॅगिंग  केवळ जिल्हा बँकेचे १५०० रुपये आहे.  इतर बँकांचे मिळून ते २१०० रुपयांपर्यंत जाते. शिवाय साखर, ताडपत्री घोटाळा अशी अनेक प्रकरणे या काळात घडली.”

सत्ताधाऱ्यांच्या विरोधात केवळ एकच आघाडी का झाली नाही याविषयी बोलताना ते म्हणाले,

 “विरोधी आघाडी एकच व्हावी अशी माझीही इच्छा  होती.  मी १४ जागा मागितल्या होत्या. परंतु त्यांनी ७ जागा देतो व अखेरच्या क्षणी वाढवून ते ८ पर्यंत आले. ते मला मान्य नसल्याने मी दादासाहेबांचे विचार मान्य असलेल्या मंडळींची आघाडी या निवडणुकीत उतरवली आहे.”

बळी पाटील – सिरसेकर म्हणाले ,” बाह्य शक्तीला रोखण्याची सभासदांना ही एकमेव संधी असून त्यासाठीच आणि सभासदांची साखर वेळेत मिळण्याबरोबरच चांगल्या कारभारासाठी कौलवकर आघाडीला सभासदांनी मोठ्या मताधिक्याने विजयी करावे .   भोगावतीचे खाजगीकरण करून ती कुणाच्यातरी घशात घालण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना आता जागा दाखविण्याची वेळ आली आहे .”

एक नोट एक वोट

 

जाहीर सभेनंतर अनेक सभासदांनी कौलवकर आघाडी निवडून येण्यासाठी निवडणूक निधीला मदत देण्यासाठी  व्यासपीठासमोर एकच गर्दी केली.